Blog

copyright © - Indus Source Books

चिंतनाचा अर्थ

By Manoj Acharya

 

पाण्याला स्वत:चा असा आकार नाही, मात्र त्याला ज्या पात्रात आपण घालतो तसा त्याला आकार प्राप्त होतो. त्याप्रकारेच आपल्या चित्तालादेखील स्वत:चा असा आकार नसतो. त्यामुळे आपण त्याला ज्या विचारात गुंतवू तसे ते आकार घेते. म्हणूनच आपल्या एकूण जगण्यात चिंतनाला खूप महत्त्व आहे. एखादी गोष्ट तुम्ही ऐकली असेल, पाहिली असेल, काही वाचले असेल तर अशा  विषयावर गंभीरपणे विचार करणे, मनन करणे म्हणजेच चिंतन. अशा गंभीर चिंतनाने विचारांना दिशा मिळते. पण बर्‍याचवेळा आपण नको त्या गोष्टींचेच चिंतन अधिक करत राहतो आणि स्वास्थ्य बिघडवून घेतो. उदाहरणार्थ, अर्थ विषयासंबंधी आपलं चित्त जेव्हा जेव्हा चिंतन करायला लागतं, तेव्हा लोभ उत्पन्न होतो, चित्त जेव्हा स्त्री विषयक चिंतन करायला लागतं, तेव्हा वासना उत्पन्न होते, चित्त जेव्हा आपल्या आप्त आणि मित्रपरीवारासंबंधी चिंतन करायला लागतं, तेव्हा मोह उत्पन्न होतो. चित्त आजाराविषयक चिंतन करायला लागलं की आजार वाढतो.म्हणूनच चित्ताला सकारात्मक विषयासंबंधीच चिंतन करायला शिकवलं पाहिजे.त्यासाठी आपल्यातला विवेक जागा असणं खूप गरजेचं असतं. आपलं मन हे आत्म्याचं सर्वोपरी साधन आहे. मनाचे कार्य आहे आत्म्यापासून प्राप्त झालेल्या संदेशांना कार्यान्वित करण्याचा संकल्प करणे. मन ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्या साहाय्यानं कार्य करण्याला आपल्याला प्रेरीत करत असतं. मनाच्या गुणवत्तेवरच तुमच्यातलं माणूसपण निर्भर असतं. अन्यथा मन दूषित झाल्यास माणसाचा व्यवहार हा पशुवत होतो. आपल्या अंत:करणाच्या अंतर्गत मन, बुद्धि, चित्त आणि अहंकार या सार्‍या गोष्टी येतात. मात्र कार्याचे विभाजन पाहाता मन आणि चित्त भिन्न-भिन्न आहेत हे आपण कधीच लक्षात घेत नाही.

        चिंतन हे विकसित मेंदूची एक सहज प्रक्रिया आहे. चिंतन म्हणजे गंभीरपणे केलेल्या विचारांचा अर्क. जिथे चिंतन आहे तिथेच विचार आहेत. तिथेच तुमच्यातल्या वैचारिकतेचे दर्शन इतरांना घडू शकतं. चिंतन म्हटलं तर एक प्रकारचे मंथन आहे. जर तुमचे चिंतन सकारात्मक आणि गंभीर असेल, तर ते मंथन अमृतदायीच असू शकते. पण  जर त्यात नकारात्मकता असेल आणि गंभीरपणा नसेल, तर ते विष उत्पादकच असू शकतं. समुद्र मंथनातून सुरुवातीस प्राणहार विषच प्राप्त झालं होतं. कारण ते मंथन वरवरचे आणि त्यात कोणताही सदसदविवेक नसलेले ते होते. मात्र जेव्हा सूर-असूरांनी गंभीर होऊन मंथन केले, तेव्हा अमरत्व प्रदान करणारं अमृत प्राप्त झालं. म्हणूनच विषपानापासून वाचण्यासाठी चिंतन सकारात्मकच असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, सूर्य पूर्वेला उगवतो प्रकाश पसरवतो व सायंकाळी त्याचा अस्त होतो. आणि आपण अंधकारात बुडून जातो. पण ही गोष्ट खरी आहे का, की आपला तो दृष्टिभ्रम आहे. कारण सूर्य ना उगवतो आणि ना अस्त होतो. हे सारं पृथ्वीच्या परीक्रमेमुळे घडत असतं. पृथ्वीची परिक्रमा आणि परिभ्रमण आपल्याला भ्रमित करतं आणि तोच भ्रम आपल्या चिंतनाला दूषितदेखील करतं. सूर्य आणि आत्मा, दोन्ही शाश्वत आहेत. पण पृथ्वी आणि शरीर दोन्ही नश्वर आणि मायाग्रस्त आहेत, मात्र आपलं चुकीचं किंवा असंतुलित चिंतन याच्या परस्पर विरुद्ध सूर्याला गतिशील आणि पृथ्वीला स्थिर मानतं. तेव्हाच तर आपण मूर्खासारखे सूर्योदय आणि सूर्यास्त सारख्या भ्रामक शब्दांना जन्म देऊन ते इतके रूढ करतो की, प्रत्येक मनुष्य तेच स्वीकार कराण्याचा यत्‍‌न करत असतो. थोडक्यात, कितीही वाईट परीस्थिती असली तरी चुकीच्या गोष्टींचे चिंतन न करता, चांगल्या सकारात्मक गोष्टींबाबत चिंतन केलेत, तरच विचारांना प्रगल्भता प्राप्त होऊन कोणत्याही संकटाला तुम्ही धैर्याने, साहसाने तोंड देऊ शकाल.

        मननशीलता हा गुण आपल्यात असल्या कारणानेच आपल्याला मनुष्य म्हटलं जातं. जसा मनाचा स्वभाव किंवा गुण असतो तसाच तो मनुष्य असतो. चित्ताचे काम चिंतन करणे आहे. आणि मनाचे काम मनन करणं आहे. चिंतन चित्तात असल्या कारणाने त्याच्याबरोबर बु्द्धी येतेच.शास्त्रांत बुद्धी ही निश्चित असल्याचं सांगितलं गेलं आहे. बुद्धीत विचार करण्याचा गुण असल्या कारणानेच ती कोणत्याही विषयास निश्चित रूप देण्याचा प्रयत्न करते. चिंतन ही निर्विकल्प अशी स्थिति आहे, जी ज्ञानपूर्वक होते. आध्यात्मिक जगतात केवळ आत्मा आणि परमात्मा यांचेच चिंतन केलं जातं. अन्य विषयासंबंधी ते गंभीरपणे केलं जात नाही. त्यामुळे ते विचार सीमांच्या बंधनात अडकतात ते योग्य नाही. शास्त्रांत चिंता आणि चिता यांच्या विचारांबाबत सांगितलं गेलं आहे की, मनुष्य चिंता करत करत चितेपर्यंत स्वत:च पोहोचतो. मात्र जर त्याने आपले चित्त अनेक गंभीर विषयांच्या चिंतनात घालवले तर, तो सकारात्मक मार्गात अग्रेसर होऊ शकतो. चिंतन साधनेची प्रारंभिक अवस्था आहे. म्हणून चिंतनाला महत्त्व द्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes:

<a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>