Blog

copyright © - Indus Source Books

अमरावतीच्या आठवणी

By उदय कुलकर्णी

१९६९च्या कधीतरी आधी आम्ही अमरावतीला राहत होतो तेव्हाची गोष्ट.  मी शाळकरी विद्यार्थी होतो. रुक्मिणीनगर ही अमरावतीतील मध्यमवर्गीयांची शांत वस्ती. तिथे शाळेतल्या मित्राकडे दुपारी क्रिकेट खेळायला आलो होतो. मैदान असं नव्हतं, परंतु मोकळी जागा होती तिथे आम्ही खेळत होतो. एका भक्कम बांध्याच्या गृहस्थांचे तिथे लूनावरून आगमन झाले. त्यावेळेस अमरावतीत लूना या अगदी छोट्याश्या दुचाकी वाहनाचा इतका सुळसुळाट झाला होता की अमरावतीनगरी  लूनानगरी झाली असा लेखच तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रात छापून आला होता. तर हे गृहस्थ लूना थांबवून तिथे उभे राहिले.  साहजिकच आमचा खेळ थांबला. लूनावर बसल्या बसल्याच मग ते आमच्याकडे बघून म्हणाले, तुमच्यासाठी मैदानाची सोय करतो, ही सोय करतो, ती सोय करतो. खेळणाऱ्या मुलांचे कौतुक  त्यांना करावेसे वाटले. मुलांनी पण हो हो म्हणून मान हलवली. नंतर ते गृहस्थ तिथून निघून गेले. मी विचारलं कोण आहेत हे? तर एक मुलगा म्हणाला, ते सुरेश भट. त्या काळी असं ओळख नसतानाही मोठी माणसं सहज मुलाचं कौतुक करत.  मला तर चांगलंच वाटलं की हे मुलांसाठी काही सोय करत आहेत. तेव्हा सुरेश भट यांचं इतकं नाव झालेलं नव्हतं.  अनेक वर्षांनी हे नाव कानावर यायला लागलं तेव्हा हा किस्सा आठवायचा.  पुढे त्यांनी जे काही मराठी मनावर गारूड घातलं ते सांगायची गरज नाहीच. गझल, कविता, गाणी यांची अमूल्य देणगी आपल्याला दिली. मैदानाची सोय भले केली नसेल, मराठी समाजाच्या पुढच्या अनेक-अनेक पिढ्यांची त्यांनी सोय करून ठेवली आहे हे मात्र खरं. नंतर सुरेश भट मला वाटतं नागपूरला राहत होते, मुंबईला राहत होते. आता मला माझ्या अमरावतीच्या मित्राकडून कळतं, अमरावतीला जरा गावाबाहेर भटवाडी नावाची एक मोठी जागा  ह्या कुटुंबाच्या नावावर होती आणि तिथे हे कुटुंब बंगला बांधून राहत होतं.  नंतर मी आता कित्येक वर्षांनी मी फेसबुकवर आलो, तर इथे सुरेश भट यांचे सुपुत्र चित्तरंजन भट हे फेसबुक फ्रेंड झाले.

वसंत आबाजी डहाके व प्रभा गणोरकर हे कवी व साहित्यिकसुद्धा अमरावतीचे. अमरावतीला मालटेकडी नावाची एक छोटीशी टेकडी आहे त्याच्या जवळपास  राहायचे. विदर्भ महाविद्यालय हे अमरावतीतील प्रख्यात, मोठे सरकारी कॉलेज. १९७० साली मी तिथे बी.एस्सी.साठी प्रवेश घेतला, तेव्हा आम्हाला मराठी शिकवायला होत्या प्रभा गणोरकर.  एकदा आम्हाला बातमी मिळाली गणोरकर मॅडम स्टाफ रूमच्या बाहेर उत्तर पत्रिका देत आहेत. मार्क जाणून घेण्याची उत्सुकता तर सगळ्यांनाच असते. आम्ही पाच-सहा मित्र तिथे गेलो आणि नाव सांगून आमचा पेपर, आमचा पेपर असा गलका करू लागलो. त्यांनी पेपरच्या गठ्यातून माझा पेपर शोधून काढला, क्षणभर माझ्याकडे रोखून बघितलं, मला वाटलं मी फारच गलका केला होता की काय? पण काही न बोलता त्यांनी उत्तर पत्रिका माझ्या हातात दिली. मला मराठीत शंभरपैकी चौसष्ट मार्क मिळाले होते. सायन्सच्या विद्यार्थ्याला मराठीत एवढे चांगले मार्क म्हणून त्यांनी बहुदा बघितलं होतं. खरी गंमत तर पुढेच आहे, पेपर घेऊन मी निघून गेलो आणि नंतर सगळ्या मार्कांची टोटल केली तर ती ७४ होत होती. त्यांच्याकडे पुन्हा जाऊन दुरुस्ती करून घ्यायला पाहिजे होती, पण पण त्यांनी जे रोखून बघितलं होतं त्यामुळे माझी काही हिंमत झाली नाही!  तसंही ती परीक्षा काही वार्षिक परीक्षा वगैरे नव्हतीच, त्यामुळे मार्काच्या दृष्टीने फार महत्व नव्हतं, पण हुशार विद्यार्थी म्हणून कदाचित गणोरकर मॅडम यांच्या लक्षात राहिलो असतो. पुढे काही वर्षांनी डहाके सर आणि गणोरकर मॅडम मुंबईला आले. मी त्यांची एक-दोनदा कामासाठी भेट घेतली होती. डहाके सरांनी कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आणि त्या गाजलेल्या आहेत. या दोघांनी मिळून संशोधनाचं काम पण खूप केलेलं आहे. साहित्य जगतात त्यांना फार मानाचे स्थान आहे. आता मी फेसबुकवर आहे, काही कवी माझ्या मित्रयादीत आहेत, त्यावरून तर मला कळतं, वसंत आबाजी डहाके म्हणजे या कवींसाठी एक अतिशय आदरणीय, ज्येष्ठ आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आहे.

अरुण साधू हे नाव उच्चारल्याबरोबरच मराठी वाचकांना मुंबई दिनांक आणि सिंहासन या त्यांच्या कादंबऱ्या आठवतील. या दोन्हीवर मिळून निघालेला सिंहासन सिनेमाही आठवेल. मुंबई दिनांक कादंबरी आली तेव्हा तशा प्रकारातील ती पहिलीच मराठी कादंबरी. पण अरुण साधू तिथेच थांबले नाहीत, त्यांनी त्रिशंकू ही दलित नायक असलेली कादंबरी लिहिली, विज्ञान काल्पनिका लिहिली आणि त्यांच्या मुखवटा कादंबरीविषयी काय बोलावं? ही मराठीतील एक उत्कृष्ट कादंबरी आहे. अरुण साधू जितके महान साहित्यिक होते तितकेच ते फार चांगले पत्रकार होते. महाराष्ट्रात १९७२ साली दुष्काळ पडला होता त्याचं वार्तांकन ते करत, तेव्हा असं म्हटलं जायचं की त्यांचं वार्तांकन वाचून त्याप्रमाणे सरकार कार्यवाही करतं.

अरुण साधू यांना काहीवेळा भेटण्याचा योग आला. प्रत्येक वेळेला त्यांना मी त्यांचा भक्त आहे याची जाणीव करून द्यायचो. मराठीतील साधूंच्या मानाने तरुण असलेले आणि पत्रकार व लेखक असलेले संजीव लाटकर हेही माझ्या आवडीचे. तेव्हा संजीव लाटकर व अरुण साधू यांचे बोलणे-चर्चा घडवायची व त्याचं शब्दांकन करायचं असा एक बेत मी ग्रंथालीच्या रुची मासिकासाठी केला. त्याप्रमाणे लाटकर यांच्या घरी या गप्पा झाल्या. त्याचं जवळपास अकरा किंवा अठरा पानी शब्दांकन अपर्णा पाडगावकरांनी केलं होतं आणि ते रुचीमध्ये छापून आलं होतं.

अरुण साधूंच्या त्रिशंकू कादंबरीवर गजेंद्र अहिरे यांनी टीव्ही मालिका केली होती, त्यात किशोर कदम यांनी काम केलं होतं. तेव्हा तर मालिकेचा एखादा भाग आवडला तेव्हा मी चक्क अरुण साधूंना फोन करून त्याबद्दल उत्साहाने सांगत असे आणि ते शांतपणे ऐकून घेत.

अरुण साधूंनी विठ्ठलराव विखे पाटील यांचं सहकारधुरीण हे चरित्र इंग्लिश व मराठीत लिहिलं आहे. मराठी पुस्तकाचं परीक्षण मी महाराष्ट्र टाइम्ससाठी केलं होतं. ते प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांचा फोन येईल अशी वाट बघितली. नंतर बरेच दिवसांनी मी स्वतःच त्यांना ते मेल केलं, तेव्हा त्यांचं उत्तर आलं, परीक्षण प्रसिद्ध झालं तेव्हा ते अमरावतीला दौऱ्यावर गेले होते आणि त्यांना कोणी कळवलं नाही, त्यामुळे मी पाठवल्यावरच त्यांना माहिती झालं. त्यांनी अर्थातच त्याबद्दल आनंद व्यक्त केला होता.

माझी एक दीर्घकथा वाचून त्यांनी अभिप्राय कळवणार पोस्टकार्डसुद्धा पाठवलं होतं, ते मी जपून ठेवलेलं आहे.

पुढे आम्ही अमरावतीहून नागपूरला राहायला गेलो, तेव्हा माणूस कादंबरीचे लेखक मनोहर तल्हार माझ्या मित्राच्या शेजारी राहायचे. त्यांच्या माणूस कादंबरीत अमरावतीचा परिसर आलेला आहे, त्यातील नायक आहे अमरावतीचा रिक्षेवाला. मनोहर तल्हार यांना भेटण्याचा योग मात्र आला नाही.  अमरावतीचे आणखी एक लेखक आहेत, धग ह्या कादंबरीने प्रसिद्ध झालेले उद्धव ज. शेळके. त्यांनाही भेटायला मिळाले नाही.

तर असे हे अमरावतीचे काही मान्यवर साहित्यिक आणि माझ्या आठवणी.

Leave a Comment